आज वैशाख कृष्णपक्ष प्रतिपदा, देवर्षी भगवान श्रीनारदांची जयंती , त्या निमित्त त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत....! नारायण नारायण या नामस्मरणात तल्लीन झालेले देवर्षी नारद आयुर्वेद, व्याकरण ज्योतिष शास्त्र , शिक्षण यातील प्रकाण्ड विद्वान म्हणून ओळखले जातात , तर संगीताचे परिपूर्ण ज्ञान, कुशल राजनितीज्ञ, कवी , प्रभावशाली वक्ता व महापंडीत म्हणून मान्यता पावलेले आहेत . अनेक रचना व ग्रंथ त्यांनी रचले .त्यांनी भक्तिसूत्रांची रचना केली. श्रीनारदांच्या नावाचे एक पुराणही उपलब्ध आहे. त्यांनी वैष्णव तंत्राची निर्मिती केली. त्याला नारद पांचरात्र म्हणतात . तिन्ही लोकांमध्ये मुक्त पणे संचार करण्याची ताकत त्यांच्यात विद्यमान आहे .कुठेही मुक्तपणे संचार करणे आणि तेथील माहिती व समस्या लोक कल्याणासाठी योग्य व्यक्ती पर्यंत पोहचविणारा आणि म्हणून याअर्थी आद्य पत्रकार म्हणून गौरविलेले देवर्षी.
भक्तश्रेष्ठ मानले जातात त्या देवर्षी श्रीनारदांची कथा मोठी रोचक आहे. हे श्रीनारद पूर्वजन्मी एका दासीच्या घरी जन्माला आले . त्यांच्या गावातील धर्मशाळेत काही साधू चातुर्मास्यासाठी राहिले होते. त्यांच्या आई त्या साधूंची मनोभावे सेवा करीत असत. त्यामुळे या बालकालाही संतांची सेवा करायला मिळाली व भक्तीचे बीज त्यांच्यात रुजले . त्यांनी उर्वरित आयुष्य भगवंतांच्या अखंड नामस्मरणात भ्रमण करीत घालवले . याच फळ म्हणून पुढील जन्म त्यांना साक्षात परमपिता ब्रम्हांचा मानसपुत्र म्हणून मिळाला .
नारदीय कीर्तन म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या या कीर्तन शैलीचे जनक नारद आहेत .नारद महर्षींनी सुरु केलेल्या या कीर्तनपरंपरेचे पुढे मध्ययुगीन काळात अनेक संतांनी आचरण केलेले आपण पाहतो. देवर्षी नारदांना कीर्तनभक्तीचे आचार्य म्हटले जाते. म्हणून आजही कीर्तनकार ज्या गादीवर/गालिच्यावर उभे राहून कीर्तन करतात त्याला " नारदांची गादी " म्हणतात.
भक्तश्रेष्ठ श्रीनारदांना " देवर्षी " म्हणतात. ज्या महात्म्यांना " गर्भ दीक्षा " देता येते, त्यांनाच शास्त्रांमध्ये देवर्षी म्हटले जाते. गर्भातील जीवाला शक्तिपात दीक्षा देणे हे अत्यंत जोखमीचे , अवघड व अधिकारच कार्य आहे. देवर्षी नारदांनी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांना अशी गर्भदीक्षा प्रदान केली होती म्हणून त्यांना देवर्षी म्हणून मान्यता आहे .
भगवंतांना अत्यंत आवडणारे संतस्मरण करणे हे आपले साधक म्हणून कर्तव्यच आहे. म्हणून आजच्या जयंतीदिनी आपण प्रेमभराने भगवान श्रीनारदांचे स्मरण करून त्यांना प्रेमभक्तीचे दान मागूया.