काश्मीरातील अत्याचार आणि माध्यम
कश्मीर , कला आणि कावकाव, हे संपादकीय वाचले. या अग्रलेखात असा ठळक उल्लेख आहे की ‘ काश्मीरी पंडितांबाबत जे काही झाले ते अत्यंत खरे आणि दुर्दैवीच’. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर 32 वर्षांनी ‘असे घडले होते’, हे देषातील माध्यमांना मान्य करावे लागले यातच ‘ द काश्मीर फाईल्स ’ या चित्रपटाचे यश सामावले आहे. मुळात हा चित्रपट निर्माण करण्याची गरज का भासली? यावर पारदर्षी मंथन व्हायला पाहिजे. तसे होतांना मात्र दिसत नाही.
1989/90 साली ज्यावेळी काश्मीर राज्यात अत्याचाराचे तांडव घडले त्यावेळची राजकीय परिस्थिती आजपेक्षा पूर्णपणे भिन्न होती ही बाब कशी नाकारता येईल ? याचमुळे जे क्रूर व भयानक घडले त्याची त्रोटक माहिती भारतीयांपर्यंत पोचू शकली हे देखील वास्तव आहे. भारतीय जनमानसांपर्यंत या घटना पोचविण्यात मुख्य धारेतील व स्थानिक माध्यमे तोकडी पडली हे मान्य करावेच लागेल. आपल्या देशात राजकारणी जसे आपल्या उणीवा कधीच मान्य करीत नाहीत तसेच जर माध्यमे करू लागली तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? या चित्रपटाकडे काॅंग्रेस /भाजपा या चैकटीच्या पलीकडे जावून बघायला हवे तरच आपण सकारात्मक निर्णयापर्यंत पोहचू शकतो. अग्रलेखात परदेशातील आणि दशातील श्रेष्ठ चित्रपटांची जी सूची मांडली आहे त्या तूलनेत काश्मीर फाईल्स ही कलाकृती त्या बरोबरीची आहे की डावी आहे याबाबत मतभेद असू शकतात. या एकाच कारणास्तव या चित्रपटातील सार्थकता संपत नाही. या देशात गेल्या अनेक वर्षांपासून असा समज दृढ झाला आहे की डाव्या विचारसरणीच्या लोकांचा अभ्यास दांडगा असून त्यांना युक्तिवादात टक्कर देणे इतर विचारसरणीच्या लोकांना शक्य होेत नाही. या चित्रपटाचा शेवट या प्रस्थापित धारणेला छेद देतो, हे या चित्रपटाचे मुख्य यश म्हणावे लागेल. काहींना हे बटबटीत व अतिरंजित वाटल्यास त्याला इलाज नाही. गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात अशी ओरड होत आहे की, या देशात अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. या पाश्र्वभूमीवर भारताच्या प्रसारमंत्र्यांसमोर इस्त्रायल देशाचे प्रमुख परीक्षक धाडसी विधान करू शकले ही बाब महत्वाची ठरते. जगातील किती देशात असे घडू शकते याचा तपशील संपादकीयात दिला असता तर ते संयुक्तिक ठरले असते.
हा चित्रपट निर्माण होण्यास सुमारे 32 वर्षांचा कालावधी लागला ही बाब देशाच्या राजकीय परिस्थितीवर तसेच माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. ताष्कंद फाईल व राॅकेटरी सारखे चित्रपट निर्माण झाले कारण या बाबतीतील सत्य लपविण्याचा प्रयत्न झाला. नामांकित श्शास्त्रज्ञ नम्बी नारायणन यांच्यावरील झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यास देशातील माध्यमं असमर्थ ठरलीत. यास्तव त्यांना स्वतः पुस्तक लिहून देशवासियांसमोर सत्य कथन करावे लागले. कालांतराने या कथानकावर आधारित चित्रपट प्रसारित झाला. त्यांच्यावरील झालेल्या घोर अन्यायाला केरळ राज्यातील काॅग्रेस व कम्युनिस्ट पक्षातील साठमारीची पृष्ठभूमी होती. ही बाब देशासाठी शोकांतिका नाही का? एवढेच नव्हे तर मल्याळम भाषिक माध्यमांनी तर नम्बी नारायणन यांना केव्हाच देषद्रोही ठरवून टाकले होते. याला माध्यमांची प्रगल्भता म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत सत्य व वास्तविकता पुढे आणण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते. कथीत नम्बी नारायणन हेरगिरी प्रकरणामुळे भारताची अंतरिक्ष क्षेत्रातील प्रगती किमान 10 वर्षे मागे गेली ही बाब देशातील माध्यमं उजागर करू शकली नाहीत हे कसे नाकारता येईल?
सतीश भा. मराठे,
आपला कृपाभिलाशी
स्तीश भा. मराठे
नागपूर.
( 9422477668 )